विरार बोलींज मध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
विरार – आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट व ३०० हून अधिक तरुणींची मुंबईत विक्री करणारा दलाल अशोक दास याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या पथकाने विरार बोलींज येथील म्हाडाच्या सदनिकेत शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकून अटक केली.यामध्ये एका अल्पवयीन (१७) वर्षीय मुलीसह दोन तरुणींची या पथकाने सुटका केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बांगलादेशी अशोक दास हा इसम आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक तरुण युवतींना देह-विक्री व्यापारासाठी मुंबईत आणून त्यांच्याकडून विरार पश्चिम येथील बोलींज येथे असलेल्या म्हाडाच्या इमारतीमधील डी-७, सदनिका क्रमांक २१०४ मध्ये ठेवून त्यांच्याकडून देहविक्री करून नंतर त्यांना मुंबई येथील ग्रँड रोड येथे विक्री करत होता.
अशोक दास याने शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी एका (१७) वर्षीय अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींना विरार बोलींज येथे आणून तो त्यांची विक्री करणार होता अशी गोपनीय माहिती नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी या सदनिकेवर आपल्या पथकासह छापा टाकून अशोक दास याला अटक करून एका (१७) वर्षीय अल्पवयीन मुलीसह दोन तरुणांची सुटका केली आहे. या प्रकरणात समाविष्ट असलेल्या दोन अन्य फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.