कल्याणच्या तृप्ती लॉजमध्ये महिलेचा खून, आरोपी फरार
कल्याण – (प्रतिनिधी) येथील पश्चिम परिसरात असलेल्या तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास योगी तोरडमल (३२) व भुपेंद्र सिंग (४०) हे दोघेजण तृप्ती लॉजमध्ये रहाण्यास आले होते. शनिवारी रात्री जेवण आणण्याचा बहाण्याने भुपेंद्र गिरी हा बाहेर पडला तो परत लॉजवर आलाच नाही. रविवारी सकाळी ९ वाजता वेळ तपासणीसाठी लॉजमधील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला असता बराच वेळ कोणताच प्रतिसाद आला नसल्याने त्यांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडला असता महिला मृत अवस्थेत दिसून आली. लॉजच्या व्यवस्थापकाने नजीकच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली असता महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली.
महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत महिलेच्या सोबत आलेला तिचा साथीदार रात्रीच पसार झाल्याने पोलिसांनी त्याच्या शोधात दोन पथके रवाना केली आहेत.मृत योगी तोरडमल ही महिला घाटकोपर येथे रहात होती तर संशयित आरोपी हा नवी मुंबई परिसरात रहात आहे. फिर्यादी असलेल्या मृत महिलेच्या आई वडिलांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले आहे.