डोंबिवलीत सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली असून रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोरा (वय ४९) यांच्यावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बोरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुनी डोंबिवली येथील शिव मंदिर परिसरात गेल्या आठवड्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. आरोपींनी बोरा यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, एका कारचालकाने धारदार हत्याराने हल्ला केल्याने बोरा यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी बोरा यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बुलेट मोटारसायकलींवर आलेले चार जण आणि क्रेटा कार चालक अशा एकूण पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलावर हल्ल्याच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.