उल्हासनगर शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन, नंतर सेवा पूर्ववत

उल्हासनगर शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन, नंतर सेवा पूर्ववत

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी केलेल्या तोडफोडीमुळे गुरुवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपचारादरम्यान भगवान निंभोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयातील डॉक्टर कक्ष, कर्मचारी विभाग तसेच वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली.

या घटनेनंतर संतप्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव कामबंद आंदोलन सुरू केले. रुग्णालयात वारंवार अशा घटना घडत असल्याने भीतीच्या वातावरणात काम करावे लागत असल्याची नाराजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon