वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यावर बंदी नाही; अफवांना महापौरांचा समाचार
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर कोणतीही बंदी नसल्याचे मुंबईच्या महापौरांनी स्पष्ट करत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. आज महापौरांनी स्वतः वाकोला मासळी बाजाराला भेट देत कोळी भगिनी व स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधला.
“मी आहे तुमच्या पाठीशी, मासे कापा बिनधास्त,” असे म्हणत महापौरांनी कोळी समाजाला दिलासा दिला. मुंबईतील सर्व मासळी बाजारांमध्ये व्यवसाय सुरळीत सुरू राहील, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
महापौरांनी स्पष्ट केले की, मासे कापण्यावर महानगरपालिकेकडून कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. काही माध्यमांमधून पसरवण्यात आलेल्या बातम्या या अपप्रचाराचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी स्थानिक कोळी भगिनींनीही “आम्हाला कोणी अडवले नाही किंवा त्रास दिला नाही,” असे सांगत अफवांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास थेट संपर्क साधावा, सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.