बीड भूसंपादन घोटाळा : माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींच्या गैरव्यवहाराची धक्कादायक उकल
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मोबदला प्रकरणातील कोट्यवधींच्या घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे. लातूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करत असून यापूर्वीच दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसभर चाललेल्या कसून चौकशीनंतर पाठक यांना अटक करण्यात आली. या घोटाळ्याचा तपास सध्या एम. व्यंकटराम यांच्याकडे आहे.
तपासानुसार, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून मोबदला वाढवून देण्यात आल्याचा आरोप आहे. या बनावट आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे ७३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बदली झाल्यानंतरही त्यांच्या नावाने मागील तारखांचे बनावट आदेश काढण्यात आले. या आदेशांद्वारे तब्बल १५४ प्रकरणांत २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला. त्यापैकी अंदाजे ७३ कोटी ४ लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरितही करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भूसंपादन समन्वय कार्यालयाकडे कोणतीही नोंद किंवा अधिकृत रजिस्टर उपलब्ध नसल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे जाळे आणखी व्यापक असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.