सौर प्रकल्पाच्या ऑडिटसाठी १८ हजारांची लाच; महावितरणच्या महिला अभियंत्याला एसीबीकडून अटक
पोलीस महानगर नेटवर्क
कडा : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून संबंधित निधी मंजूर करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
दुपारी सुमारे दोनच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पथकाने शिंदे यांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर आणि पुरी यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी पुढील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात वारंवार समोर येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.