नगरसेविका सहर शेख आणि तिच्या वडिलांच्या अडचणीत वाढ; थेट फॉरेन्सिक चाचणीची मागणी

नगरसेविका सहर शेख आणि तिच्या वडिलांच्या अडचणीत वाढ; थेट फॉरेन्सिक चाचणीची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ठाणे महापालिकेतील मुंब्रामधील नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यानंतरही सहर शेख आणि युनिस शेख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. बोगस जात प्रमाणपत्राची तक्रार करणारे जावेद शेख यांनी नवा आरोप करत फॉरेन्सिक चाचणी मागणी केली आहे.

आपल्या निवडणुकीतील विजयापेक्षा भाषणातील ‘कैसे हराया’ या वाक्यामुळे एमआयएमची नगरसेविका सहर शेख चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर आता सहर आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. युनूस शेख यांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस असून त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार जावेद शेख यांनी केला आहे. या प्रकरणातील कागदपत्रांची आता फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जावेद शेख यांनी सहरच्या वडिलांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. युनूस शेख यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जी कागदपत्रे दाखवली होती, ती पूर्णपणे बोगस आहेत. त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रशासन आणि जनतेची दिशाभूल केली आहे, असे जावेद शेख यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी युनूस शेख कोणतेही ठोस कारण न देता अनुपस्थित राहिले, ज्यामुळे त्यांच्यावरील संशय अधिक बळावला असल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे आणि सह्यांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांची फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) चाचणी करण्यात यावी, अशी मागणी जावेद शेख यांनी केली आहे. सरकारी शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा असून, याप्रकरणी सखोल तपास झाल्यास सहार शेख आणि तिच्या वडिलांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता यावर पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon