गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ‘रेव्ह’चा कहर : नशेच्या गोळ्यांमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; इटलीच्या 999999999 कॉन्सर्टनंतर खळबळ

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ‘रेव्ह’चा कहर : नशेच्या गोळ्यांमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; इटलीच्या 999999999 कॉन्सर्टनंतर खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटर मधील हॉल क्रमांक ५ येथे आयोजित टेक्नो म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ‘रेव्ह’ पार्टीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नशेच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या या कॉन्सर्टमध्ये मुंबईतील विविध महाविद्यालयांतील सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उघडपणे अमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उपस्थितांपैकी सुमारे ८० टक्के तरुणांनी ड्रग्ज घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नेस्कोचे दोन कर्मचारी, एक आयोजक, दोन विद्यार्थी आणि एक ड्रग्ज पुरवठादार अशा सहा जणांना अटक केली आहे. ड्रग्ज पुरवठ्याच्या आरोपाखाली आनंद पटेल याला कल्याण येथील वायले नगर परिसरातून पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्याचे समजते. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा मोठ्या कार्यक्रमात अमली पदार्थांचा मुक्त वापर कसा झाला, याबाबत मुंबई पोलिसांवरही टीका होत आहे.

दरम्यान, या कॉन्सर्टमध्ये इटलीची प्रसिद्ध टेक्नो DJ जोडी 999999999 यांचा लाईव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता. ‘नाईन टाईम्स नाईन’ म्हणून ओळखली जाणारी ही जोडी हार्ड टेक्नो आणि अॅसिड टेक्नो प्रकारातील संगीतासाठी प्रसिद्ध असून जागतिक स्तरावर त्यांच्या परफॉर्मन्सला मोठी मागणी आहे.

“Acid Blood”, “Love 4 Rave” यांसारख्या ट्रॅक्समुळे तरुणांमध्ये या जोडीची विशेष क्रेझ आहे. Awakenings, Tomorrowland आणि Electric Daisy Carnival सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे.
टेक्नो म्युझिक आणि रेव्ह संस्कृतीचा वाढता प्रभाव लक्षात घेता अशा कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. मात्र, या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनासाठी हा गंभीर इशारा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon