मुंबई हादरली : २४ तासांत दादर–माटुंगा–खेरवाडीत तीन हत्या; किरकोळ वाद ठरले जीवघेणे

मुंबई हादरली : २४ तासांत दादर–माटुंगा–खेरवाडीत तीन हत्या; किरकोळ वाद ठरले जीवघेणे

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत रविवारी घडलेल्या सलग तीन हत्यांच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दादर, माटुंगा आणि वांद्रे (खेरवाडी) परिसरात अवघ्या २४ तासांत तीन जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, या तिन्ही घटना टोळीयुद्धाशी संबंधित नसून किरकोळ वाद आणि वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दादरमधील घटनेत पूर्ववैमनस्यातून सात जणांनी अंकुश आंबेकर यांना त्यांच्या पत्नीसमोर बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

माटुंगा येथे पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ नागरिक नरेश वाघेला यांचा मृत्यू झाला. वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादात दोन आरोपींनी त्यांना मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माटुंगा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, वांद्रेतील खेरवाडी परिसरात अभिनव चौधरी यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

एकाच दिवशी घडलेल्या या तिन्ही घटनांनी मुंबईकरांना हादरवून सोडले आहे. भररस्त्यात, कुटुंबीयांसमोर आणि लोकांच्या उपस्थितीत अशा प्रकारे हत्या होणे ही चिंतेची बाब असून, “गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon