वर्तकनगर पोलिसांची सतर्क कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद
सुधीर गुजर / प्रतिनिधी
ठाणे : वर्तकनगर पोलिसांनी सतर्क पेट्रोलिंगदरम्यान मोठी कामगिरी बजावत बेकायदेशीर गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात नियमित गस्त सुरू असताना संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांचे लक्ष गेले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
तत्काळ पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
वर्तकनगर पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, अशा प्रकारच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.