नितीन सिग्नलजवळ ‘माथेफिरू’ची तोडफोड; १०-१२ वाहनांचे नुकसान, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील नितीन सिग्नलजवळील ग्रीन रोड परिसरात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार घडला. रुग्णवाहिका मार्गक्रमण करत असताना एका माथेफिरू व्यक्तीने अचानक संतापाच्या भरात सुमारे १० ते १२ वाहनांची तोडफोड केली. या घटनेत अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अत्यंत जवळ आहे. हा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो आणि येथे कायम कडक पोलीस बंदोबस्त असतो. अशा हाय-प्रोफाइल भागातच एवढ्या मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.