पोलिस खात्यात अशोक खरातची ‘घुसखोरी’?; डीसीपी-एसीपी दर्जाच्या दोन महिला अधिकाऱ्यांवर संशय

Spread the love

पोलिस खात्यात अशोक खरातची ‘घुसखोरी’?; डीसीपी-एसीपी दर्जाच्या दोन महिला अधिकाऱ्यांवर संशय

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक : तथाकथित भोंदू अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता पोलिस खात्यातही उमटू लागले असून, दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. त्यापैकी एक अधिकारी डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची असल्याचे समोर येत आहे.

आवडती पोस्टिंग मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खरातचा आधार घेतला होता का, असा सवाल उपस्थित होत आहे. याशिवाय, त्यांच्या आणि खरात यांच्यात कोणते आर्थिक व्यवहार झाले होते का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तथाकथित ‘वशीकरण’ किंवा ‘चमत्कार’ यांचा आधार घेतल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही हातचलाखी असल्याचेही त्याने चौकशीत मान्य केल्याचे समजते. या प्रकरणात खरातला आणखी कोणाची मदत होती का, याचाही तपास सुरू आहे.

विशेष तपास पथक या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा चौकशीसाठी हजर झाला आहे. मंगळवारी त्याची तसेच खरातच्या मुलीचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, त्याची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे.

अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपत असून, बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी एसआयटीकडून त्याचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon