नांदेडमध्ये पोलिस-आरोपी चकमक; मुख्य आरोपी जखमी, तिघे अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्राच्या सीमावर्ती महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे पोलिस आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी यांच्यात चकमक झाल्याची घटना उघडकीस आली. या चकमकीत मुख्य आरोपी अंकुश गंधमवार जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच इतर तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी पहाटे श्रीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर या तरुणावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कल्याणकर हे एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचे सुपुत्र असून स्थानिक राजकारणातही सक्रिय होते. प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू करत आरोपींचा माग काढला. मुख्य आरोपी झरी गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी गोळीबार सुरू केला. त्यावर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले. या चकमकीत मुख्य आरोपी गंधमवार याला गोळी लागली.
दरम्यान, या प्रकरणात एकूण चार जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून प्रसाद उर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रवी उर्फ रोहित लोट या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या तीन दिवसांत शहरात घडलेल्या पाच हत्यांच्या घटनांमुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.