अमर महल जंक्शनवर अनधिकृत कंटेनर; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : चेंबूरमधील अमर महल जंक्शन परिसरात सर्व्हिस रोडवर उभा करण्यात आलेला अनधिकृत कंटेनर वाहतूक कोंडीचे कारण ठरत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात काँग्रेस नेते आझम लब्बई यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर महाल जंक्शनवरील पी. एल. लोखंडे मार्गावर मेट्रोच्या पिलर्सचे काम सुरू आहे. त्यातच सर्व्हिस रोडवर काही असामाजिक घटकांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कंटेनर उभा केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून परिसरात सतत कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
या प्रकरणी महापालिका, वाहतूक पोलीस आणि टिळकनगर पोलीस ठाणे यांच्याकडे अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असतानाही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत आझम लब्बई यांनी ‘एक्स’वरूनही आवाज उठवत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य वाहतूक व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याच ठिकाणी यापूर्वी कंटेनरमध्ये थांबणाऱ्या काही व्यक्तींनी एका वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याचीही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तरीही संबंधित यंत्रणा निष्क्रिय का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.