छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेट उघड; दोन बहिणींसह तिघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

Spread the love

छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेट उघड; दोन बहिणींसह तिघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : शहरालगतच्या सातारा परिसरात जिल्हा परिषद शाळेसमोरच बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या बहिणींसह एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या रॅकेटची मुख्य सूत्रधार असलेली नर्स फरार असून तिचा शोध सुरू आहे.

प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात बेकायदेशीर गर्भपात केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. २३ वर्षीय विवाहित महिलेला गर्भपातासाठी तिचा पती आणि नणंद घेऊन आले असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहाथ पकडले.

तपासादरम्यान या रॅकेटबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या. ज्योती भीमराव पवार ही या संपूर्ण प्रकाराची सूत्रधार असून ती जीएनएम (GNM) नर्स असल्याचे निष्पन्न झाले आहे. केवळ १५ हजार रुपयांत पोर्टेबल यंत्राच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी केली जात होती. गर्भ मुलीचा असल्यास गोळ्यांद्वारे गर्भपात करण्यात येत असल्याचेही उघड झाले. काही प्रकरणांत महिलांना इतर ठिकाणी पाठवून मोठ्या रकमेची उकळपट्टी केल्याचाही संशय आहे.

छाप्याची चाहूल लागताच मुख्य आरोपी ज्योती पवार ही घटनास्थळावरून पसार झाली. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असून तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील व्यापक जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेसारख्या ठिकाणासमोरच अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon