भिगवण अपहरण प्रकरणात नाट्यमय वळण; आरोपीचा काका अझर शेख अटकेत, तरुणीचा न्यायालयात जबाब बदलला
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मुख्य आरोपी जहीर शेखचा काका अझर शेख आणि त्याचा साथीदार युवराज मेंगावडे यांना अटक केली आहे. दरम्यान, तरुणीने इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेला जबाब बदलल्याने तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
अटक करण्यात आलेला अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून तो या प्रकरणातील मुख्य आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा चुलता आहे. अझर शेख याच्यावर दौंड पोलीस ठाणेच्या हद्दीत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा आरोप असून, त्या गुन्ह्यात तो दीर्घकाळ फरार होता.
पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी अझर शेख हा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेसाठी दबाव वाढला होता. अखेर पोलिसांनी शोधमोहीम राबवून अझर शेख आणि युवराज मेंगावडे यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणाची सुरुवात १७ फेब्रुवारी रोजी झाली. तरुणी आई व भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी बाजारात गेली असताना, अज्ञातांनी मिरचीची पूड फेकून तिचे बळजबरीने अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र तपासात असे निष्पन्न झाले की, तरुणी १७ फेब्रुवारी रोजी जहीर शेखसोबत घरातून निघून गेली होती आणि २० फेब्रुवारी रोजी दोघेही बारामती शहर पोलीस ठाणे येथे स्वतःहून हजर झाले होते.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात असेही समोर आले की, पोलीस ठाण्यात हजर होण्याच्या काही तास आधी अझर शेख याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर ‘सदैव एकनिष्ठ’ असा स्टेटस ठेवला होता. यावरून तरुण-तरुणीला पळवून नेण्यात आणि त्यांना मदत करण्यात अझर शेखचा सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.
सुरुवातीला तरुणीने पोलिसांसमोर तसेच बारामती सत्र न्यायालयात आपण स्वतःच्या मर्जीने जहीर शेखसोबत गेल्याचे सांगत अपहरणाची तक्रार खोटी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव तिला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र पाच दिवसांनंतर इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत तिने आपला जबाब बदलत, आपल्याला आई व मामाकडे परत जायचे असल्याचे स्पष्ट केले. या बदललेल्या भूमिकेमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.