पोलिसाच्याच ५ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला घटनास्थळीच अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील वरळी परिसरात खळबळजनक घटना घडलीय. एका व्यक्तीने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्याच पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. पण मुलाच्या आईची सतर्कता, स्थानिक नागरिकांची तत्परता आणि वरळी पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच अटक केली आहे. ही घटना वरळी पोलीस कॅम्प परिसरातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख लक्ष्मण कालू चौधरी (५५) अशी असून तो साकीनाका परिसरातील रहिवासी आहे. मुलाचे वडील सचिन तावरे कुलाबा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता मुलाची आई कोमल सचिन तावरे (३३) गृहिणी असून वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहतात, त्या घरी स्वयंपाक करत होत्या. याच वेळी त्यांचा मुलगा शेजारच्या एका मुलीसोबत जवळच्या दुकानात नाश्ता आणण्यासाठी गेला होता. सुमारे १५ मिनिटांनंतर तीच आठ वर्षांची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत परत आली आणि तिनं कोमल यांना सांगितले की एक व्यक्ती त्यांच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जात आहे.
हे ऐकताच मुलाच्या आईला धडकी भरली आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवळपास ५० ते ५५ वर्षांचा एक व्यक्ती त्यांच्या मुलाला अरुंद गल्लीमधून ओढत समुद्राच्या दिशेने घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिलं. महिलेने आरडाओरडा केला, त्यावेळेस आजूबाजूचे स्थानिक नागरिक जमा झाले आणि आरोपीच्या तावडीतून मुलाची सुटका केली.यादरम्यान एका स्थानिकाने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच वरळी पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आरोपीला ताब्यात घेतले. मुलाला सुरक्षितरित्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. वरळी पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
वरळी पोलिसांनी सांगितले की, ही घटना वेळीच रोखण्यात आली. मुलाच्या आईची आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचा नेमका उद्देश काय होता आणि तो वरळी पोलीस कॅम्प परिसरात कसा पोहोचला, याचा तपास केला जातोय.