समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, ९ जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पाकिस्तानकडून पुन्हा भारतात काही दहशतवादी कारवायाचा करण्याचा डाव तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, भारतीय जवानांनी पाकिस्तानचा एक मोठा कट समुद्र तटावरच उधळून लावला आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ‘अल मदीना’ या समुद्र बोटीला ताब्यात घेतलं असून या बोटीतून भारातीय हद्दीत येणाऱ्या ९ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा समुद्रमार्गे भारतात येऊन काही दहशतवादी कारवाया करण्याचा डाव तर नव्हता ना? याचा तपास भारतीय सैन्य दलाकडून होत आहे.
भारतात पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगामध्ये निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये, २० पेक्षा जास्त भारतीय मृत्यूमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याच दखल घेत, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक घडवून आणला होता. त्यामुळे,दोन्ही देशातील सीमारेषेवर अधिकच तणाव निर्माण झाला होता. मात्र, जागतिक स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैन्य दलाने युद्धविराम दिला. मात्र, आता भारतीय समुद्र सीमारेषेवर गुजरातजवळ भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावला आहे.
भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानची अल मदीना नावाची बोट पकडली असून त्यातील ९ जणांना अटक केली आहे. या सर्व संशयीतांना गुजरातच्या पोरबंदर येथे आणण्यात आले आहे. भारताची समुद्र सीमा आता सर्वसाधारण नाही, हे भारतीय सैन्य दलाने दाखवून दिलंय. अरबी समुद्रात १४ जानेवारीच्या मध्यरात्री मोठा काळोख असताना, भारतीय तटरक्षक दलाची बोट पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी, समुद्र तटावर एक संशयीत हालचाल दिसून आल्याने भारतीय सैन्याने गंभीर दखल घेऊन पाठलाग केला. आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा रेषेवर भारतीय हद्दीत एक बोट गपचूप शांतपणे पुढे जात होती. ही केवळ मच्छिमार करणारी बोट नव्हती, तर त्यातील सर्वांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे, भारतीय सैन्य दलाची बोट तिकडे आगेकूच होताच, त्या बोटीने पाकिस्तानच्या दिशेने पिछेहट केल्याचं दिसून आलं. तसेच, पाकिस्तानी बोटीने आपला स्पीडही वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी या बोटीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, या बोटीसह संशयीत ९ जणांना पोरबंदर येथील सीमा रेषेवर आणण्यात आले असून भारतीय सुरक्षा एजन्सीज म्हणजेच आयबी, रॉ आणि एटीएसनेही या बोटीतील संशयीतांच्या अनुशंगाने तपास सुरू केला आहे.