कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : १६ जानेवारीला ८ केंद्रांवर मतमोजणी, यंत्रणा सज्ज
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठीची मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असून त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली. या निवडणुकीची मतमोजणी एकूण आठ ठिकाणी होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ आणि ४ यांची मतमोजणी एकाच ठिकाणी पार पडणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ यांच्या अखत्यारित १७ टेबल्सवर मतमोजणी होणार असून पॅनल क्रमांक २ व ३ मध्ये प्रत्येकी सात फेऱ्या, तर पॅनल क्रमांक ४ मध्ये पाच फेऱ्यांत मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ यांच्याकडे १४ टेबल्सवर पॅनल क्रमांक १, ५, ६ व १० मध्ये अनुक्रमे सहा, तीन, चार व तीन फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ यांच्या अंतर्गत १४ टेबल्सवर पॅनल क्रमांक ७, ८ व ९ मध्ये चार, पाच व चार फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ यांच्याकडेही १४ टेबल्स असून पॅनल क्रमांक ११, १२ व १८ मध्ये चार, पाच व चार फेऱ्या होतील.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ यांच्याकडे १६ टेबल्सवर पॅनल क्रमांक १३, १४, १५ व १६ मध्ये अनुक्रमे तीन, तीन, तीन व चार फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ६ यांच्या अंतर्गत १४ टेबल्सवर पॅनल क्रमांक २०, २६, २७ व २८ मध्ये चार, पाच, चार व चार फेऱ्या होतील.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ७ यांच्याकडे १५ टेबल्सवर पॅनल क्रमांक २१, २२, २३ व २५ मध्ये तीन, चार, तीन व पाच फेऱ्यांत मतमोजणी पार पडेल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ८ यांच्याकडे सात टेबल्सवर एकाचवेळी पॅनल क्रमांक २९ व ३० मध्ये प्रत्येकी नऊ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ९ यांच्या अंतर्गत १६ टेबल्सवर पॅनल क्रमांक १७, १९ व ३१ मध्ये अनुक्रमे १३, १२ व १३ फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.