वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ३.८६ कोटींची फसवणूक; १५ गुन्ह्यांतील आंतरराज्यीय आरोपीला केज पोलिसांनी अटक

Spread the love

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ३.८६ कोटींची फसवणूक; १५ गुन्ह्यांतील आंतरराज्यीय आरोपीला केज पोलिसांनी अटक

पोलीस महानगर नेटवर्क

बीड/केज: वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यभर तसेच परराज्यातील तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला केज पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एकूण १५ ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (२७) यांची फेसबुकवरून ‘एस. के. एज्युकेशन’ संस्थेच्या नावाखाली कुलकर्णीशी ओळख झाली. एमडी (मेडिसिन) अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असल्याने कुलकर्णीने वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. ९९ लाखांची फी ६५ लाखांवर तडजोड करून ठरवण्यात आली. त्यानंतर २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान आरोपीने रोख व ऑनलाइन स्वरूपात ८ लाख रुपये उकळले. मात्र प्रवेश न मिळाल्याने व पैसे परत न दिल्याने डॉ. तोंडे यांनी धारूर पोलिसांत तक्रार दिली.

तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. कुलकर्णीविरुद्ध नाशिक, सोलापूर (ग्रामीण व शहर), जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली या जिल्ह्यांसह पंजाबमधील अमृतसर आणि गुजरातमधील देसा सिटी येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. विविध ठिकाणी त्याने एकूण ३.८६ कोटींचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.

सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी तपासाची सूत्रे स्वतः हाती घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधमोहीम राबवली. सातत्याने ठिकाणे बदलणाऱ्या आरोपीचा माग काढत केज पोलिसांच्या पथकाने १३ जानेवारी २०२६ रोजी कराड (जि. सातारा) येथून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जावेद कराडकर व पथकाने, बीडच्या सायबर व तांत्रिक विश्लेषण सेलच्या मदतीने केली.

आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon