पतीच्या निधनानंतरही ‘वेशभूषेवरून’ छळ; जीन्स घातल्याच्या कारणावरून विधवा महिलेवर सासू-दिरांची मारहाण
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पतीच्या निधनानंतर महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार अद्यापही सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जीन्स परिधान केल्याच्या कारणावरून ३३ वर्षीय विधवा महिलेवर सासू, दीर आणि मुलीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सहकारनगर परिसरात घडली. या मारहाणीत महिलेचा हात मोडला असून ती सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कचरावेचक असून चार मुलांसह तळजाई वसाहत परिसरात वास्तव्यास आहे. तिच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती जीन्स परिधान करून घराबाहेर थांबली असताना तिची सासू सविता तेथे आली. जीन्स घातल्याच्या रागातून सासूने सुनेचे केस ओढून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सासूने महिलेच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीदरम्यान पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिची मोठी मुलगी घटनास्थळी आली. मात्र आईला वाचवण्याऐवजी ती आजीसोबत मिळून आईला मारहाण करू लागली. त्याचवेळी दिराने महिलेचा डावा हात जोरात पिरगळल्याने मनगटाजवळील हाड मोडले. या झटापटीत पीडितेच्या मुलांनाही मारहाण करण्यात आली, तसेच तिचा मोबाइल फोनही काढून घेण्यात आला.
घटनेनंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात सासू, दीर आणि मुलीविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत महिलेच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून, पतीच्या निधनानंतरही महिलांच्या कपड्यांवरून आणि वैयक्तिक आयुष्यावरून होणारा छळ हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.