गोव्यातील अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून फरार; मुंबईहून थायलंडमधील फुकेत येथे इंडिगोच्या विमानाने रवाना
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गोव्यातील रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेले आहेत. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर पाच तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानानं थायलंडमधील फुकेत गाठलं. गोवा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. लुथरा परदेशात नेमके कुठे गेले, त्याचा ठावठिकाणा काय, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेण्याची योजना आखली आहे.
बर्च बाय रोमियो लेन क्लबला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करत आहेत. एफआयआर दाखल होताच पोलिसांचं एक पथक तातडीनं दिल्लीला पोहोचलं. आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवण्यात आल्या.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. मुंबई इमिग्रेशनशी संपर्क साधण्यात आला. दोन्ही आरोपी ७ डिसेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता इंडिगोच्या फ्लाईट 6E 1073 नं फुकेटसाठी रवाना झाले होते. लुथरा यांच्या क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. त्यानंतर पुढील काही तासांत सौरभ आणि गौरव लुथरा यांनी देश सोडला.
गोवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधलेला आहे. दोघांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान पोलिसांनी दिल्लीहून भारत कोहलीला ताब्यात घेतलं आहे. त्याला पुढील चौकशीसाठी गोव्याला आणण्यात आलं आहे. सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन पूर्ण करण्यात आलं असून ते संबंधितांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.