कर्तव्यावरून परतताना तहसीलदारावर तलाठ्याची हल्लाबोल; अर्धापूरात खळबळ, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड : अर्धापूर तालुक्यात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी कारवाई सुरू असताना प्रभारी तहसीलदारावर त्यांच्या अधिनस्त तलाठ्यानेच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महसूल वर्तुळासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार आर. डी. शिंदे हे दि. ५ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पथकासह अवैध वाळू वाहतुकीवर करडी नजर ठेवून होते. यावेळी पिंपळगाव (म.) येथून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा व एक टिप्पर त्यांनी ताब्यात घेतले. कारवाई सुरू असतानाच तलाठी प्रदीप उबाळे याने अचानक तहसीलदार शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. काही कळायच्या आत तहसीलदारांना मारहाण करण्यात आली.
या घटनेबाबत तहसीलदार आर. डी. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात संबंधित तलाठ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्यावर अवैध वाळूसारख्या गंभीर विषयात हस्तक्षेप करून हल्ला करणे हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. या घटनेनंतर महसूल व पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास अर्धापूर पोलीस करत आहेत.