पुण्यात चुलत भावानेच दिली ४ लाखांची सुपारी; नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात एका तरुणाच्या खुनाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या चुलत भावाचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका आरोपीने खुनासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
१७ नोव्हेंबरला कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (२२) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रथम अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत याला अटक केली.
प्राथमिक चौकशीत अशोकला अजयचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने हा खून केल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता, हे प्रकरण ‘सुपारी देऊन’ खून केल्याचे असल्याचे उघड झाले.
अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी त्याचा साथीदार कृष्णकुमार विजयमहतो वर्मा, सचिनकुमार शंकर पासवान आणि या गुन्ह्यातील पहिला साक्षीदार असलेल्या रणजितकुमार धनुखी यादव यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले.
खुनाच्या गुन्ह्यात हा साक्षीदार स्वतः सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांना मोठा धक्का बसला. यामुळे पोलिसांनी तातडीने चौघांचा शोध सुरू केला. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हे चारही आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने त्यांच्या मूळ गावी झारखंडला पसार होणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने सापळा रचून या चौघांनाही अटक केली. भारती विद्यापीठ पोलिस या गुंतागुंतीच्या खुनाच्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.