नकली नोटा देऊन फसवण्याचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा

Spread the love

नकली नोटा देऊन फसवण्याचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – बोदवड तालुक्यातील नांदगाव परिसरात १ लाखांच्या बदल्यात ५ लाख देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत चार संशयित जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नांदगावच्या पोलिस पाटील प्रियंका भंगाळे यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता गावात चार अनोळखी व्यक्तींना चोरीच्या संशयावरून पकडून मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. हवालदार अय्यूब तडवी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौघांना ताब्यात घेतले. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे हलवण्यात आले.

उपचारानंतर घेतलेल्या चौकशीत फिर्यादी संजयकुमार प्रेमचंद पिपलोदिया (४४, रा. सुसनेर, जि. आगर, म. प्र.) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास उड्डाणपुलाजवळील निर्जन भागात आरोपींनी त्यांना बोलावले. त्यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवत १ लाखांच्या बदल्यात ५ लाख देण्याचे आमिष दाखवले. परंतु प्रत्यक्षात मुलांच्या खेळण्यातील ‘भारतीय बच्चो का बँक’ अशा नकली नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी पिपलोदिया आणि त्यांचा मित्र गिरीराज पवार यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने १ लाख रुपये हिसकावून घेतल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी सय्यद साबीर, अंकल अशोक पारधी, करम किरण बोदडे, प्रज्ञात समाधान पाटील, सैय्यद मेरिफ, नीलेश पुरळ आणि विकी गुरचळ अशा सात संशयितांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली एमएच-१९ बीके १५२९ क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. बोदवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon