बनावट सोन्याचे ३४ लॉकेट गहाण ठेवून सराफाची ३० लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणजवळील मोहने परिसरात बनावट सोन्याचे ३४ लॉकेट गहाण ठेवून दोन इसमांनी एका सराफाची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. मागील दोन वर्षांत कल्याण-डोंबिवली परिसरात ज्वेलर्सना लक्ष्य करणाऱ्या अशा फसवणूक प्रकरणात वाढ होत असून, स्थानिक सराफांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहने बाजारातील साईकुमार ज्वेलर्सचे मालक प्रवीण श्रीरंग करांडे (३९) यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून विजेंदर राजपूत (४२) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
करांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही राजपूत यांनी त्यांच्यासोबत चार वेळा सोन्याचे व्यवहार केले होते. प्रत्येक वेळेस व्यवहार चोख पार पडल्याने यावेळीही त्यांनी राजपूत यांच्यावर विश्वास ठेवला. बुधवारी सकाळी राजपूत आणि त्याचा साथीदार दुकानात आले. त्यांनी ३४ लॉकेट गहाण ठेवण्याची विनंती करत ती कॅरेट सोन्याची असल्याचा विश्वास निर्माण केला. त्यांच्या आडनावावर आणि आधीच्या व्यवहारांवर विश्वास ठेवून करांडे यांनी बाजारभावानुसार ३० लाखांची रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली.
यानंतर करांडे यांनी त्यांच्या यंत्रणेवर लॉकेटची शुद्धता तपासली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ राजपूत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळले. शिवाय, त्यांचा पत्ता किंवा कार्यालयाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने करांडे यांना त्यांचा माग काढता आला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच करांडे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आशा निकम यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.