बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एका ड्रग्स पार्टी प्रकरणात समन्स
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ओरी नंतर आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका ड्रग्स पार्टी प्रकरणात समन्स पाठवले आहे. या प्रकरणात सिद्धांत कपूरला नोव्हेंबर २५ रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी समन्स बजावूनही हजर न झालेल्या ओरीला आता नोव्हेंबर २६ ही नवी तारीख देण्यात आली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य आणि फरार ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा जवळचा सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याने मुंबई आणि दुबईमध्ये रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या पार्ट्यांमध्ये कथितरित्या दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह, अभिनेत्री नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर हे सहभागी झाले होते.
या पार्ट्यांमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींमध्ये काही मोठे आणि महत्त्वाचे लोक होते. पोलिसांनी मुंबईतील न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान, रॅपर लोका , ओरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीशान सिद्दीकी यांसारखे काही इतर व्यक्तीही कथितरित्या या पार्ट्यांमध्ये उपस्थित असल्याचे म्हटले आहे. या हाय-प्रोफाइल पार्टी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एएनसी चा तपास सुरू आहे.