वडाळ्यात खंडणी विरोधी कक्षाची धडाकेबाज कारवाई; बेकायदेशीर शस्त्रविक्री रोकण्यासाठी पाच जणांना अटक
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – शहरात बेकायदेशीर शस्त्रविक्री रोखण्यासाठी खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांनी वडाळा परिसरात मोठी कारवाई करत पाच जणांना विनापरवाना अग्निशस्त्रांसह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत बारकाईने आखलेल्या सापळ्यात करण्यात आली.
गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती विनापरवाना अग्निशस्त्रे विक्रीसाठी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता वडाळा पूर्व येथील जे. के. नॉलेज सेंटर रोड, भारत पेट्रोलियम समोरील गल्ली, बि.पी.टी. कंटेनर रोडलगत येणार असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचला. त्यानुसार पथकाने क्लृप्ती वापरत त्या इसमांना रंगेहात पकडले.
पोलिसांनी कारवाईदरम्यान एक ४ देशी बनावटीची पिस्तुले, मॅगझीन आणि १८ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. प्राथमिक चौकशीत या इसमांनी हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी कक्षामार्फत सुरू आहे.
अटक केलेले आरोपी :
१. भैय्यु रामपाल खरे (३६)
२. दशरथ अंबाराम बारुलीया (३०)
३. सुलतान कैलास बारोलीया (२८)
४. धर्मेंद्र मनफुल भाटी (३५)
५. गौरव सुंदरलाल देवडा (२७)
या कारवाईचे मार्गदर्शन मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केले. तसेच सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, डीसीपी (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि एसीपी डी (विशेष) किशोरकुमार शिंदे यांचे सहकार्य लाभले.
ही कारवाई प्र.पो.नि. संजय तरळगट्टी, पो.नि. अरुण थोरात, स.पो.नि. मारुती कदम, विशाल मोहिते, जालिंद्र लेंभे तसेच विशेष कार्य पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. खंडणी विरोधी कक्षाच्या वेळेवर आणि अचूक हस्तक्षेपामुळे वडाळा परिसरात संभाव्य मोठी गुन्हेगारी घटना टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.