लाहोरमध्ये जन्मलेल्या बॉलिवूडच्या सर्वात वयस्कर अभिनेत्रीचा मुंबईत मृत्यू; कामिनी कौशल यांचा निधनाने बॉलिवूडवर शोककळा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार मंडळींनी सध्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अभिनेता गोविंदा देखील प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. अशातच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.या अभिनेत्रीचा जन्म पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला. तिनं तिचं संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलं. हिंदी सिनेमांत काम करत आपलं नाव कमावलं. अखेर वृद्धापकाळाने तिने या जगाचा निरोप घेतला. ही अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात वयस्कर अभिनेत्री होती.
अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन झालं आहे. त्या बॉलिवूडच्या सर्वात वयस्कर अभिनेत्री होत्या. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अभिनेत्री कामिनी कौशल या धर्मेंद्र यांचा को स्टार होत्या. त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं होतं. “माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट शहीदची नायिका कामिनी कौशल यांच्यासोबत पहिल्या भेटीचा पहिला फोटो… दोघांच्या चेहऱ्यावर हसू… एक प्रेमळ ओळख”, असं म्हणत धर्मेंद्र यांनी कामिनी कौशल यांचे फोटो शेअर केले होते. धर्मेंद्र यांच्याबरोबरचं त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर सारख्या दिग्गज कलाकारांबरोबरही अनेक सिनेमे केले.
कामिनी कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.कामिनी कौशल यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२७ साली पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला. त्यांचं खरं नाव उमा कश्यप असं होतं. १९४६ साली नीचा नगर या सिनेमातून कामिनी कौशल यांनी सिनेमात पदार्पण केलं आहे. बिरज बहू या सिनेमासाठी त्यांना १९५५ सालचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.