ठाणे महानगरपालिका विद्यार्थ्यांसाठी “प्रतिरूप मुलाखतीचे” आयोजन; आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

Spread the love

ठाणे महानगरपालिका विद्यार्थ्यांसाठी “प्रतिरूप मुलाखतीचे” आयोजन; आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२५ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ महिन्यांत दोन दिवसीय “प्रतिरूप मुलाखतीचे” सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

या प्रशिक्षण सत्रासाठी कार्यरत आणि सेवानिवृत्त आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी, यूपीएससी तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच वरिष्ठ पत्रकारांचा पॅनल तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अंतिम यूपीएससी मुलाखतीसाठी प्रभावी तयारी करता येणार आहे.

यापूर्वी २५ मे २०२५ रोजी यूपीएससी पूर्व परीक्षा तर २२ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुख्य परीक्षा पार पडली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिरूप मुलाखत सत्राचा लाभ घेता येईल.

सहभागी विद्यार्थ्यांनी आपले डीएएफ २ अर्ज संस्थेच्या [email protected] या ई-मेलवर सादर करावे. त्यानंतर तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून डीएएफ विश्लेषण करण्यात येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना यूपीएससी बोर्ड मुलाखतीत अधिक चांगली तयारी करता येईल.

इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले नाव २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत https://forms.gle/o2KDHWsNZNeqdn6X9 या लिंकवर नोंदवावे. अधिक माहितीसाठी ०२२–२५८८१४२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही ठाणे महानगरपालिका चालवित असलेली नि:शुल्क यूपीएससी मार्गदर्शन संस्था असून, आतापर्यंत संस्थेतील ९१ प्रशिक्षणार्थींनी यूपीएससी आणि ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एमपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षांत यश संपादन केले आहे. देशात अशा प्रकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon