मोबाईल फोनवरील फोटो आणि मेसेजवरून ट्रांसजेंडरचा मित्रासोबत वाद; माहिम खाडीत दोघांनी उडी घेत संपवल आयुष्य
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय ट्रांसजेंडरचा मित्रासोबत मोबाईल आणि फोटोवरुन झालेल्या वादावरुन स्वत:ला संपवल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राचाही जीव गेला आहे. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांचाही मृत्यू झाला.
ही घटना माहिम येथील खाडीजवळ मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. वांद्रे लालमट्टी येथील रहिवासी कलंदर अल्ताफ खान या २० वर्षीय तरुणाशी झालेल्या वादानंतर एका २० वर्षीय ट्रान्सजेंडर व्यक्तीने खाडीत उडी मारली. मोबाईल फोनवरील काही फोटो आणि मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाला असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
वाद झाल्यानंतर ट्रान्सजेंडरने स्वत:ला संपवण्यासाठी माहिमच्या खाडीत उडी घेतली. त्यानंतर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात, त्या तरुणानेही पाण्यात उडी मारली. दोघेही खाडीत पडले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन तासांहून अधिक काळ शोध मोहीम सुरू ठेवली. अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.
दोघांची ओळख कलंदर अल्ताफ खान (२१) आणि इरशाद उर्फ झारा (१९) अशी आहे, दोघेही वांद्रे लालमत्तीचे रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोघे प्रेमसंबंधात होते आणि अलीकडेच भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. पोलिस सूत्रांच्या मते, झाराला कलंदरच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या मुलीचे फोटो आणि चॅट मेसेज सापडल्यानंतर भांडण सुरू झाले होते. स्कूटरवरून माहीमकडे जात असताना वाद चालूच होता. पुलावर झाराने स्वतःला वारंवार मारले आणि अचानक पाण्यात उडी मारली. हे पाहून कलंदरने चप्पल आणि शर्ट काढले. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी त्वरित पाण्यात उडी मारली. झाराच्या कुटुंबीयांचा दावा आहे की कलंदर तिच्यावर वारंवार हल्ला करायचा आणि तिने यापूर्वी किमान तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.