बदलापुरात मोठा राजकीय भूकंप! महाविकास आघाडीसोबत ‘मनसे’ मैदानात; नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही ठरला

Spread the love

बदलापुरात मोठा राजकीय भूकंप! महाविकास आघाडीसोबत ‘मनसे’ मैदानात; नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही ठरला

योगेश पांडे / वार्ताहर

बदलापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदलापूरमध्ये महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. ही महत्त्वाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे, उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, यांनी दिली आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी हा निर्णय अंतिम टप्प्यात असून आज त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट केले.

खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या स्थानिक नेत्यांच्या दोन बैठका यापूर्वीच पार पडल्या आहेत. या युतीमध्ये जवळपास २५ ते ३० जागा निश्चित झाल्या आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा युतीला निश्चितच होईल, असा ठाम दावा खासदार म्हात्रे यांनी यावेळी केला.

युती झाली तरी, नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा असेल, असे सूतोवाच खासदार म्हात्रे यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या विषयावर बोलण्यापूर्वी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकाचा दौरा केला. त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. स्थानकावरील सीसीटीवी, पाणी, रस्ते आणि स्वच्छतागृह यांसारख्या सोयी-सुविधांची पाहणी करून त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या.यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले की, सर्वपक्षीय नेत्यांकडून उमेदवारी अर्ज भरायला उशीर होत आहे, कारण सत्ताधाऱ्यांची आपापसात भांडणे सुरू आहेत. याच कारणामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत थोडाफार विलंब होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon