गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक; माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
माणगाव : अधिक परताव्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल २८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (निवृत्ती) बोहाडे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत माणगाव तालुक्यातील नानोरे येथे घडली. फिर्यादी हे मुंबई–गोवा महामार्गालगत नानोर येथे वास्तव्यास असून, त्यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. फोन करणाऱ्याने स्वतःला नुवमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.
यानंतर फिर्यादी यांना एका लिंकद्वारे ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. सदर ॲपमार्फत ट्रेडिंग साइटवर तब्बल ₹२७,९६,८५१ इतकी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्याबदल्यात ३० टक्के अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून संबंधितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
परंतु गुंतवणुकीनंतर कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम न मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे माणगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून, पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणूकप्रवृत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.