निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं; राज ठाकरेंची जोरदार टीका
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील उत्तरांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर आणि आयोगावर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावर आयोगाच्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे,
> “आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे… हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.”
ते पुढे म्हणाले,
> “दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळांपर्यंत — यावर प्रश्न विचारल्यावर आयोगाकडे उत्तर नाही! जबाबदारी आधीच झटकली आणि आता उत्तरदायित्वही नाकारत आहेत. मग अशा पदांचा उपयोग काय?”
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचेही अभिनंदन केले. “महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहावी, कारण तुमच्या मतदानाच्या अपमानाचा उगम कुठून सुरू होतो हे यातून दिसून येईल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वीही दुबार मतदार नोंदणीच्या प्रश्नावर मनसेने “सत्याचा मोर्चा” काढत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी “दुबार मतदार दिसले तर ठोकून काढा” अशा शब्दांत टीकास्त्र सोडले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आयोगावर आपली ठाकरी शैलीतली टीका केली आहे.