रिपब्लिकन झोपडपट्टी संघाचे आजाद मैदानात एकदिवसीय आंदोलन
रवि निषाद / मुंबई
मुंबई : झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन झोपडपट्टी संघ तर्फे मुंबईतील आजाद मैदानात ३० ऑक्टोबर रोजी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन झोपडपट्टी संघ या संघटनेत हजारो झोपडपट्टीधारक सामील असून संघटनेचे प्रमुख विट्ठलराव जनार्दन सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात मोहम्मद रिजवान शेख, प्रकाश आहीवाले, दादासाहेब यादव, जीवन भालेराव, राजू रणबहादुर, भिकाजी कमले, कमालुद्दीन शेख, मयुरी शिंदे, जुबेदा शेख, खुशनुदा बानो, सुनीता देवी, नसीबुल निशा यांच्यासह हजारो झोपडपट्टीधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भाषणात विट्ठलराव सोनावणे यांनी सांगितले की, “सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही दोन ते तीन दशकांपासून ज्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होतो, तिथून आम्हाला जबरदस्तीने हटविण्यात आले. अनेक कुटुंबे सध्या रस्त्यावर राहण्यास भाग पडली आहेत, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. सरकारने तात्काळ पुनर्वसन करावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
सावित्रीबाई फुले झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष रिजवान शेख यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करताना म्हटले, “ही सरकार गरीबांच्या नव्हे तर धनाढ्यांच्या बाजूने उभी आहे. जून २०२४ पासून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील झोपडपट्टीधारकांना बेघर करण्यात आले, मात्र त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही सोय अद्याप करण्यात आलेली नाही. हे सरकारचे जनविरोधी धोरण असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो.”
या आंदोलनाद्वारे झोपडपट्टीधारकांनी पुनर्वसन, मूलभूत सुविधा आणि निवाऱ्याचा अधिकार या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.