अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात मोक्का अंतर्गत राज्यातील पहिली कारवाई! ९५३ पानी दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा (बांद्रा युनिट) यांनी अंमली पदार्थ विक्री आणि निर्मितीत गुंतलेल्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ मोक्का अंतर्गत राज्यातील पहिलं प्रकरण विशेष मोक्का न्यायालयात दाखल केलं आहे.
या कारवाईचा आधार ठरलेल्या गुन्हा क्रमांक ६१/२०२५ (दिनांक ७ ऑगस्ट २०२५) मध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीने संघटित गुन्हेगारी स्वरूपात अमली पदार्थांचा व्यवसाय केल्याचं तपासात उघड झालं. गुन्ह्याच्या अनुषंगाने मोक्का कायद्यानुसार कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) यांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. अटक आरोपींमध्ये अदनान आमीर शेख व कायनात जब्बार शेख (महिला आरोपी) तर, या टोळीचा प्रमुख जमीर अहमद अब्दुल खालीक अन्सारी उर्फ बोका सध्या फरार आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने या प्रकरणात ९५३ पानांचे तपशीलवार दोषारोपपत्र १ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष मोक्का न्यायालय (कोर्ट क्र. ५५, सत्र न्यायालय, मुंबई) येथे सादर केले आहे.
ही कारवाई मोक्का च्या सुधारीत कायद्यानुसार महाराष्ट्रातील पहिली कारवाई ठरली असून तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
“निरोगी आयुष्य निवडा — नशेला ‘नाही’ म्हणा!”