पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बकरी-बोकड योजना; खाटिक समाजाचा अनोखा निर्णय चर्चेत
रवि निषाद / मुंबई
मुंबई – राज्यातील मराठवाडा, सोलापूर, जालना आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले, पशुधन मृत्युमुखी पडले आणि अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले. हाताशी शेती नाही, अंगणात जनावरं नाहीत अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डगमगला आहे.
अशा वेळी सरकारकडून मदतीच्या घोषणा होत असल्या तरी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालणारा ठोस पुढाकार महाराष्ट्र राज्य खाटिक समाजाने घेतला आहे. समाजाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी एक बकरी आणि बोकड देण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमाचा पुढाकार भाजप नेते व राज्य मुस्लिम खाटिक समाजाचे नेते हाजी अरफात शेख यांनी घेतला आहे.
“फक्त पोटभर अन्न देऊन शेतकरी उभा राहणार नाही. त्याला नव्याने जगण्यासाठी आधार हवा. बकरी-बोकड जोडीमुळे शेतकऱ्यांना दूध मिळेल, तसेच उत्पन्नाचाही मार्ग खुलेल,” असे मत हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले.
पूरानंतर उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे नवजीवनाची नवी सुरुवात ठरणार असून, सरकारसोबत समाजही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो, याचा ठोस संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
या अनोख्या निर्णयामुळे राज्यभरात खाटिक समाजाचे पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.