आकर्षक परताव्याचं आमिष; ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळ्याचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली परिसरातून एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल.एल.पी.’ या नावाने चालवलेल्या भागीदारी संस्थेमार्फत १०० हून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणाचा पर्दाफाश करत ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार मुख्य आरोपींना अटक केली असून, अन्य चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. आरोपींनी सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना थोडाफार नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मोठ्या रकमा गुंतवायला भाग पाडले. मात्र नंतर मूळ रक्कम किंवा परतावा देणे थांबवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या संदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात ८० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
गौरव भागत, विकीन पाटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपींनी लुबाडलेली रक्कम नेमकी कुठे वळवली याचा तपास केला जाणार आहे.
पोलिसांचे आवाहन
साधारण व मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झालेल्या या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे. “जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संस्थेची शहानिशा करा,” असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
या घोटाळ्यामुळे डोंबिवलीतील शेकडो कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून, आरोपींच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.