मुंबईत दसरा-नवरात्रौत्सवासाठी भक्कम पोलिस बंदोबस्त
मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा, विजयादशमी व नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार असून, शहरात विविध मिरवणुका, मेळावे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामध्ये ७ अपर पोलिस आयुक्त, २६ उप आयुक्त, ५२ सहाय्यक आयुक्तांसह २८९० अधिकारी व १६,५५२ अंमलदार उत्सव काळात तैनात केले जाणार आहेत. त्याचबरोबर एस.आर.पी.एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट व होमगार्डस् या फौजाही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात राहतील.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी संयम पाळावा, बेवारस वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि नियमांचे पालन करून उत्सव जल्लोषात व सुरक्षिततेने साजरा करावा. आवश्यक प्रसंगी नागरिकांनी १०० / ११२ हेल्पलाईन वर संपर्क साधावा.