अंमली पदार्थ प्रकरणात विदेशी आरोपीस १२ वर्षांची सक्तमजुरी व १.२५ लाख दंडाची शिक्षा
मुंबई : बांद्रा युनिट, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) कारवाईत अटक झालेल्या आयव्हरी कोस्ट देशातील सराईत आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १२ वर्षांची सक्तमजुरी व १.२५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सन २०२१ च्या नववर्ष स्वागताच्या काळात अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात गस्तीदरम्यान वाकोला, सांताक्रुझ (प.) परिसरातून आरोपी होनोरे इग्वे गाही (४४) यास टाटा नॅनो कार (MH-43-BU-0109) सह ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून २०४ ग्रॅम कोकेन (किंमत सुमारे ₹५१ लाख) व कार (किंमत ₹१ लाख) असा एकूण ₹५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान तो भारतात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर परकीय नागरिक कायद्यान्वये अतिरिक्त कलम लावण्यात आले.
तपास अधिकारी पो.उ.नि. राम बागम व स.पो.नि. सुरेश भोये यांनी सखोल तपास करून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.
३० सप्टेंबर २०२५ रोजी विशेष सत्र न्यायालय, कोर्ट रूम क्र. ४२, मुंबई यांनी पुरावे ग्राह्य धरून आरोपीस १२ वर्षांची सक्तमजुरी व ₹१.२५ लाख दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याच्या तपास व न्यायालयीन प्रक्रियेत प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, पो.उ.नि. राम बागम, सह.पो.नि. सुरेश भोये, फिर्यादी पोलिस शिपाई सचिन राठोड, तसेच कोर्ट पैरवीसाठी पोलिस शिपाई रंगनाथ घुगे, महिला पोलिस सिपाई दिप्ती दरेकर व सुदक्षीना नेहे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (एएनसी) श्री. नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा एएनसी युनिटच्या पथकाने ही कामगिरी केली.