बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद; पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे – धुळे तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद अंतर्गत सोनुबाई शंकर शेंणगे परिवार हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षेच्या फार्म भरण्यावरून तणावग्रस्त घटना घडली आहे. काही पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण केली असून, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात बारावीच्या फॉर्म भरण्याचा काळ सुरू असताना, आर्वी येथील या शाळेतही फॉर्म भरण्याचे काम जोरात सुरु होते. मात्र, या प्रक्रियेत काही पालकांनी विद्यार्थिनीला न आणत फॉर्म भरून घेण्यास जोरदार आग्रह केला. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी स्वतः येणे आवश्यक असल्याचे सांगितले असता, पालक संतप्त झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करत, जिवे ठार मारायची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला.
घटनेनंतर काही वेळातच गावगुंड बाबुराज कान्होर, किशोर आल्होर यांनी आपल्या साथीदारांसह शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना मारहाण करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडले आणि सुमारे २५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाले, असे आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.
या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच, आरोपींविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास शाळा टाळे ठोकून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.