ऑर्थर रोड जेलमध्ये कैद्यांमध्ये राडा; जेल अधिकाऱ्यावरही प्राणघातक हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मध्यवर्ती ऑर्थर रोड कारागृहात शनिवारी दुपारी कैद्यांमध्ये झालेल्या वादातून मोठा राडा उसळला. क्षुल्लक कारणावरून दोन कैद्यांत झालेल्या हाणामारीदरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कारागृह अधिकाऱ्यावर एका कैद्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेने तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात कारागृह अधिकारी राकेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैदी अफान सैफीउदीन खान याचा इम्तियाज इस्तियाक खान या कैद्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद उग्र झाल्यानंतर दोघेही आमने-सामने आले आणि हाणामारीला सुरुवात झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कारागृह अधिकारी राकेश चव्हाण यांनी दोघांना वेगळे करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, याचाच राग धरून अफान खानने चव्हाण यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. हल्ल्यादरम्यान चव्हाण यांचे डोके गेटवर आपटले गेले, ज्यामुळे ते जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच इतर कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत अफान खानला ताब्यात घेतले व त्याला बॅरेक क्रमांक दोन मध्ये हलविण्यात आले. जखमी चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले.
दरम्यान, एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अफान खानविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तो आधीच एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असून, नव्या प्रकरणातही त्याची अटक दाखल होणार आहे. या घटनेनंतर जेल परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.