द बॅड्स ऑफ बॉलिवूड!
आर्यन खानच्या सीरिजविरोधात समीर वानखेडेंची कोर्टात धाव
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजद्वारे करिअरची सुरुवात केली. आर्यन खान दिग्दर्शित ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही सीरिज प्रदर्शित होताच त्यातील एका दृश्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. यामध्ये समीर वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. ही भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब वानखेडेंसारखाच दिसतोय. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरण आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणात आर्यनला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याला क्लीन चिट मिळाली. आता ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये दाखवलेली नक्कल पाहून समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजवर कायमस्वरुपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी वानखेडेंनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान दिग्दर्शित ८ भागांची ही सीरिज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. समीर यांनी त्यांच्या याचिकेत असा आरोप केला आहे की सीरिजमधील एक विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या पहिल्या भागातच ड्रग्जविरोधात आवाज उठवणारा एक अधिकारी दाखवण्यात आला आहे, जो हुबेहूब समीर वानखेडेंसारखाच दिसतो. ‘वॉर अगेन्स्ट ड्रग्ज’ आणि ‘एनसीजी’चा भाग असल्याचा दावा करत तो बॉलिवूडच्या एका पार्टीत छापा टाकतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने ड्रग्जचा वापर होतो, याविषयी तो ओरडतो. या सर्व गोष्टींचा उल्लेख समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यनविरोधात केलेल्या कारवाईशी संबंधित असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.
ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, २१ ग्रॅम गांजा, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि रोख १.३३ लाख रुपये जप्त केले होते. एनसीबीने १४ जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर ३ ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती.