बंगाली महिलेची पोलीस कर्मचाऱ्याकडून फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – जळगावात पोलीस कर्मचाऱ्याने पश्चिम बंगालमधील महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हे प्रकरण समोर येताच पोलीस कर्मचाऱ्यासह त्याची आई व पत्नी अशा एकूण तिघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नितीन सपकाळे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो जळगाव जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.पोलीस कर्मचाऱ्याचे याआधीच लग्न झालेले होते. मात्र बंगाली महिलेला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने आपले लग्न झाल्याचे लपवले. तसेच बंगाली महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि शहरातील विविध हॉटेल्समध्ये तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी पोलीस कर्मचाऱ्याचे बंगाली महिलेसोबत जबरदस्तीने एका मंदिरात लग्न लावून दिल्याची माहिती देखील समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.