नागपुरात रिक्षा चालकानं आमिष दाखवत तीन लहानग्यांसोबत केले लैंगिक चाळे; पोक्सो’ कायद्यांतर्गत आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नागपुर – मानकापूर पोलिस स्टेशन अंतर्गत ताज नगर येथील एका रिक्षा चालकाला तीन लहान मुलांसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीने तीन अल्पवयीन मुलांना फिरवून आणण्याच्या बहाण्याने घेऊन जात त्यांच्यासोबत लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास काही तक्रारदारांनी मानकापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या परिसरातील ८ ते १० वर्षांच्या तीन लहान मुलांना एक ऑटो चालक रिक्षात बसवून घेऊन गेला आहे. त्यांच्यासोबत त्याने लैंगिक चाळे केले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर मुलांचे पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले.
पोलिसांनी तात्काळ घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यांनी लहान मुलांना विश्वासात घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी मुलांनी सांगितले की, आरोपीने त्यांना फिरवून आणण्याचे आमिष दाखवून सोबत नेलं आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. अधिक चौकशी केली असता, त्या परिसरात नेहमी येणाऱ्या एका रिक्षा चालकावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या रिक्षाचे फोटो मिळाले. तक्रारदार आणि परिसरातील लोकांना फोटो दाखवल्यानंतर तोच रिक्षा चालक असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला. आरोपीचे नाव शेख रहेबत मुन्ना आलम असून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केली आहे.
आरोपीवर याआधीही खुनाचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेय. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने मुलांना आमिष दाखवून बोलवल्यास त्यांच्यासोबत न जाण्याचा सल्ला पालकांनी मुलांना द्यावा, तसंच अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.