मानखुर्द मेट्रो स्थानकातून ४४ लाखांचे तांब्याचे पाईप व तारांची चोरी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – पूर्व उपनगरातील मानखुर्द परिसरातील बांधकामाधीन मेट्रो स्थानकातून तब्बल ४४ लाख रुपये किमतीचे तांब्याचे पाईप व तारांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रफितींच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मानखुर्द परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मंडाळा – ठाणे कासारवडवली मेट्रो मार्गाचे काम सुरू असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चेंबूरच्या डायमंड उद्यान – मंडाळा मेट्रो मार्गावर काही दिवसांपासून चाचणीही सुरू करण्यात आली आहे. २०२५ अखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असल्याने या मार्गावर बांधकाम आणि यंत्रणांची बसवणूक वेगाने सुरू आहे.
दरम्यान, मेट्रो स्थानकातील वातानुकूलन यंत्रणा व इतर कामासाठी वापरण्यात आलेले तांब्याचे पाईप आणि तारा अचानक गायब झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. चौकशीदरम्यान सुरक्षा रक्षकांनाही यासंदर्भात काही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षभरात सुमारे ४४ लाख किमतीचे तांब्याचे साहित्य चोरीस गेले असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.