कल्याणमध्ये ‘हिंदी’ भाषेवरून राडा; महिला कर्मचाऱ्याच्या अरेरावीनंतर मनसेचा दणका
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील एका ‘पटेल मार्ट’ नावाच्या दुकानात मराठी भाषेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या दुकानात खरेदीसाठी गेले असताना एका महिला कर्मचाऱ्यासोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून जोरदार वाद झाला. घाणेकर यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता, महिला कर्मचाऱ्याने संतापून ‘मराठी बोलण्याची सक्ती आहे का?’ असे म्हणत त्यांच्याशी अरेरावी केली, ज्यामुळे वातावरण तापले आहे. या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी तात्काळ दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना या प्रकाराची माहिती दिली. त्याच वेळी, काही मनसे कार्यकर्ते देखील घटनास्थळी पोहोचले. मॅनेजर मनीषा धस यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत असे आश्वासन दिले.
या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी ‘पटेल मार्ट’ला १५ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, जर १५ ऑक्टोबरपर्यंत दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास सुरुवात केली नाही, तर ते दुकानाच्या बाहेर उभे राहून नागरिकांना येथून खरेदी न करण्याचे आवाहन करतील. व्यवस्थापक मनीषा धस यांनी घाणेकर आणि मनसे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, दुकानातील सर्व कर्मचारी मराठीतच बोलतील. मात्र, हा वाद सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे.