टिळकनगरमधील पीएसआयवर गंभीर आरोप : ‘हॉटेल सफलता’ संचालकाचा गॉडफादर ठरल्याचा नागरिकांचा आरोप
मुंबई – टिळकनगर पोलीस ठाण्यातील एका पीएसआयवर गंभीर आरोप होत असून तो हॉटेल सफलताचा संचालक व तथाकथित दबंग दिवाकर प्रजापती याचा ‘गॉडफादर’ झाल्याची चर्चा रंगली आहे. न्यायालयाचा आदेशही या पीएसआयने न जुमानल्याचा आरोप नागरिकांनी केला असून परिसरातील समाजसेवक, तसेच अनीता पाटोले यांच्यासह नागरिकांनी या प्रकरणावर कारवाईची मागणी केली आहे.
प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर, जय अंबे नगर येथे गाला क्र. ७ हे ७० वर्षीय महेश आचार्य यांचे मूळ मालकीचे आहे. काही वर्षांपूर्वी आचार्य यांनी हा गाला दिवाकर प्रजापतीला भाड्याने दिला होता. मात्र, पुढे दिवाकरने खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाल्यावरील ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने विजेचे बिल पत्नीच्या नावावर करून घेतले, तसेच न्यायालयात खोटी कागदपत्रं दाखल केली. न्यायालयाने ही सर्व कागदपत्रे फेटाळून लावत दिवाकरला फटकारले.
पोलिसांवर संगनमताचे आरोप
या प्रकरणी श्री. आचार्य यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दिवाकर, त्याची पत्नी स्वाती व कार्तिक नाडार यांच्याविरोधात तक्रार दिली. परंतु इथल्या एका पीएसआयने दिवाकरला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा पीएसआय व दिवाकर यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून गाल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात त्या पीएसआयची थेट भागीदारी असल्याचे बोलले जाते.
नागरिकांचा निषेध
११ ऑगस्ट रोजी सौ. अनीता पाटोले यांच्यासह डझनभर नागरिकांनी परिमंडळ ६ चे दक्ष व कर्तव्यदक्ष उपायुक्त समीर शेख यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर उपायुक्त शेख यांच्या फटकाऱ्यानंतर संबंधित पीएसआय शांत बसल्याचे समजते. सध्या समाजसेविका अनीता पाटोले यांनी महेश आचार्य यांच्या लढ्याला हातभार लावण्यासाठी त्या गाल्यात आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.
पुढील कारवाईची मागणी
“आम्ही महेश आचार्य यांच्यासाठी लढत राहणार. दिवाकर प्रजापती आणि त्याचा गॉडफादर बनलेला टिळकनगर पोलीस स्टेशनचा पीएसआय – या दोघांना कोर्टात खेचणार,” असे अनीता पाटोले यांनी सांगितले. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित पीएसआयवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी स्थानिक समाजसेवक व दक्ष नागरिकांनी केली आहे.