वादग्रस्त आय आयएएस पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक प्रताप; ट्रक चालकाचे अपहरण? पोलिसांशी अरेरावी
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांची आई चर्चेत आली होती. पूजा यांच्या आईचा हातात बंदूक घेऊन दमदाटी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील ऐरोली येथून एका ट्रक चालकाचे अपहरण झाले होते. हा चालक आता पूजा खेडकर यांच्या पुण्यातील चतुश्रृंगी भागातील घरी आढळला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय २२ राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच १२ आर टी ५००० या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे. दरम्यान, आता पोलीसांनी या घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाचा काय संबंध आहे हे शोधले जाणार आहे. याआधीही पूजा खेडकर यांच्या आईने दादागिरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या अपहरण प्रकरणातही खेडकर यांची अडचण वाढणार आहे.